जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यात गुरुवारी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तरुणासह दोन जणांचा बुडून मृत्यू झाला. एकाचा नदीत तर दुसऱ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. पहूर (ता. जामनेर) आणि वरणगाव (ता. भुसावळ) येथे या घटना घडल्या. ऋषीकेश समाधान किरडकर (१९, रा. पहूर) व बासीत खान रशीद खान (३८, रा. धानोरा, ता. चोपडा, ह.मु. ईमलीवाडा, वरणगाव) अशी या मृतांची नावे आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, ऋषीकेश याचा शेतातील विहिरीत तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. मृतदेह दोन तासानंतर बाहेर काढण्यात आला. ऋषीकेश हा एकुलता होता. पोलिस भरतीची तयारी करीत होता. पोलिस होण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे. तो आजोळी राहत होता. दुस-या घटनेत, बासीत खान हा नदीकाठी गेला असता त्याचा तोल जाऊन पाण्यात पडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. याबाबत वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, चार मुले, मुलगी असा परिवार आहे.