जळगाव : प्रतिनिधी
शाळा, महाविद्यालय परिसरात विद्यार्थिनींच्या छेडखानीच्या प्रकाराला आळा बसावा म्हणून पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी शहरातील विविध शाळा, महाविद्यालय परिसरात कारवाई केली.
शाळा, महाविद्यालय परिसरात टवाळखोरांकडून विद्यार्थिनीची छेड काढली जात असल्याच्या तक्रारी येत आहे. या प्रकाराची जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गंभीर दखल घेत शाळा, महाविद्यालय परिसरात फिरणाऱ्या टवाळखोरांवर कारवाईच्या सूचना पोलिस ठाण्यांच्या प्रभारींना दिल्या. पोलिस दलाच्यावतीने प्रत्येक पोलिस ठाण्यात दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली असून यासाठी अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली.
पाच टवाळखोरांना पथकाने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात नेले. याठिकाणी त्यांच्या पालकांनादेखील बोलविण्यात आले. त्या टवाळखोरांसह त्यांच्या पालकांना समज देऊन सोडून देण्यात आले. तसेच कारवाईची ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे असल्याचे सांगण्यात आले. रामानंद नगर पोलिसांनी सेंट जोसेफ शाळेच्या समोर टवाळखोर तरुणांना चोप देत १४ जणांवर कारवाई केली.
विद्यार्थिनींना पाहून अश्लील वर्तन करणाऱ्या २१ तरुणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच २५ तरुणांना समज देऊन सोडण्यात आले. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली.