मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबई येथे आमदार निवासमधील कॅन्टीन कर्मचाऱ्याने निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यामुळे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. आमदारांना अशा पद्धतीने जेवण देत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना कशा पद्धतीने जेवण मिळत असेल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या कृतीवर विधानपरिषदेत विरोधकांनी आक्षेप घेतला.
विधानपरिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमदार निवासात काही घाण असेल किंवा चुकीच्या काही गोष्टी असतील तर स्वतंत्रपणे त्यावर कारवाई करावी. पण लोकप्रतिनिधींनी मारहाण करणे हे चुकीचे आहे. त्यांनी जे केले ते चुकीचेच आहे. यामुळे आमदारांबद्दल लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो. आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो, अशा प्रकारची भावना लोकांमध्ये जाते. निश्चितपणे ही गंभीर बाब आहे आणि यावर जी काही कारवाई करायची असेल ती करण्यात यावी.
कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या संजय गायकवाड यांचे निलंबन करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. आमदाराने कसं रहावं? बनियन, टॉवेल, लुंगीवर आमदार येतो. तुम्ही रस्त्यावर राहताय का, असा सवाल त्यांनी केली. कर्मचाऱ्यांना मारता. तुमच्या हिंमत असेल, तर मंत्र्यांना मारा, अशा लोकांचा तुम्ही पाठिंबा घेणार का, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. तेव्हा फडणवीस म्हणाले की, लोकप्रतिनिधींनी मारहाण करणे योग्य नाही. त्यामुळे लोकांत चुकीचा संदेश जातो. या प्रकरणी सभापतींनी काय कारवाई करता येईल, याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन केले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय गायकवाड यांनी सांगितले की, रात्री दहा वाजता माझी जेवणाची वेळ असते. त्यामुळे काल रात्री मी नऊ-साडेनऊ वाजता वरण भात आणि पोळी याची ऑर्डर दिली होती. त्यात भातासोबत वरण मिक्स करुन मी पहिला घास घेताच मला खराब वाटला. मला वाटले वरणामध्ये चिंच असेल, म्हणून मी पोळी सोबत दुसरा घास घेतला असता मला वोमिटिंग झाली. त्यामुळे मी वरण चेक केले असता ते पूर्णपणे सडलेले होते.
पुढे बोलताना संजय गायकवाड म्हणाले, आमदारांच्या जिवाशी खेळू नका. कॅन्टिन मालकाकडून अनेकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. तिथे मिळणाऱ्या निकृष्ट जेवणासंबंधी मी यापूर्वीही तक्रार केली होती. दिवसभरात 10 हजार जण या कॅन्टिनमध्ये जेवतात. रात्री समितीच्या चेअरमनलाही हे सांगितले होते. मी जे केले ते मला मान्य आहे. मला त्याचा कोणताही पश्चाताप नाही.


