जळगाव : प्रतिनिधी
शहरातील कानळदा रस्त्यावरील लक्ष्मीनगर येथे मंगळवारी सकाळी पंढरपूरहून घरी परतलेल्या आईला आपल्या मुलाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह पाहून मोठा धक्का बसल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली. रामेश्वर लक्ष्मण भोई ऊर्फ सचिन (वय २५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वरची आई मंगलाबाई या काही दिवसांपासून पंढरपूरला गेल्या होत्या. सचिन घरात एकटाच राहत होता. मंगळवारी सकाळी ९ वाजता मंगलाबाई पंढरपूरहून आपल्या घरी परतल्या. घरी येताच समोर मुलाने गळफास घेतल्याचे पाहून त्यांना मोठा धक्का बसला. रामेश्वर आणि त्यांची आई मंगलाबाई हे दोघेच घरात राहत होते. काही वर्षांपूर्वी रामेश्वरच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे रामेश्वरच आईचा एकमेव आधार होता. रामेश्वर केळकर मार्केटमधील एका कपड्याच्या दुकानात कामाला होता. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.