चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेविकेचा विनयभंग करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी अजयसिंग राजपत यांचे निलंबन करून कारवाई करावी, अशी मागणी समता सैनिक दलातर्फे तालुका सहाय्यक वैद्यकीय अधिकारी ममराज राठोड यांना सोमवारी निवेदन देऊन करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, १५ जुलैपर्यंत कारवाई न झाल्यास धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. याबाबत आरोग्यसेविकेने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही निवेदन दिले आहे. जातीयवाद केल्याबद्दल चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्थानकात १७ जून रोजी गुन्हा दाखल केला आहे. याअनुषंगाने संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यास निलंबन करून शिस्तभंग कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु या घटनेस जवळपास एक महिना झाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली नाही. याबाबत न्याय मागण्यासाठी आरोग्य सेविका १५ जुलै रोजी उपोषणास बसणार आहेत. त्यांच्या उपोषणास समर्थन देण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी समता सैनिक दलाचे राज्याध्यक्ष धर्मभूषण बागुल यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.


