मुक्ताईनगर : प्रतिनिधी
तालुक्यातील कुन्हा येथील एका सातवीच्या विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न घडल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही विद्यार्थिनी दुसऱ्या शाळेच्या एका जिन्याखाली तोंड व पाय बांधून बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. हा प्रकार म्हणजे मुलीचे अपहरण करून तिचे बरे वाईट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत मुलीच्या नातेवाईकांनी शाळा प्रशासनाविरोधात कुऱ्हा पोलिस चौकीत आक्रोश केला. नातेवाइकांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सविस्तर वृत्त असे कि, सातवीत शिकणारी ही विद्यार्थिनी संध्याकाळी शाळा सुटल्यावर लघुशंकेसाठी गेली असता तिघा तरुणांनी तिच्या तोंडाला रुमाल लावल्याने ती बेशुद्ध झाली. त्यांनी तिच्या तोंडाला रुमाल बांधून फरफटत शाळेच्या मागे असलेल्या दुसऱ्या शाळेच्या जिन्याकडे नेले व तोंड तसेच हातपाय बांधून तिला त्या ठिकाणी डांबून ठेवले.
शाळा सुटल्यावर मुलगी परतली नाही म्हणून नातेवाईकांनी शोधाशोध केली. मुलीचे नातेवाईक तत्काळ शाळेत येऊन दाखल झाले. काही वेळानंतर ती दुसऱ्या स्कूलच्या बाजूला असलेल्या जिन्याच्या खाली बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. ती अर्धवट बेशुद्ध होती काहीवेळानंतर शुद्धीवर आली. पालकांनी तिला घेऊन पोलिस चौकी गाठली. याबाबत माहिती पसरल्यावर पंचक्रोशीतील पालक व शेकडो गावकऱ्यांनी पोलिस चौकीत गर्दी केली. दरम्यान सदर मुलीच्या सांगण्यावरून एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ग्रामीण भागातल्या मुलींचा कल हा जास्तीत जास्त मोठ्या शहराकडे असतो, परंतु त्यामुळे अशा घातपाताच्या घटना घडत असतील तर पालकांनी मुलींना शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवावे किंवा नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.
ही मुलगी बुलढाणा जिह्यातील एका गावाहून कुन्हा येथे शाळेत नियमित येते. तिच्यासोबत गावातील इतर मुली सुद्धा असतात. सुमारे चार दिवसांपासून काही तरुण त्या मुलीच्या पाळतीवर होते. याबाबत मुलीने शाळेत सांगितले होते. तसेच पालकांना सुद्धा माहिती दिली होती. त्यामुळे आज तिचे नातेवाईक कुन्हा येथे आले होते. तिच्यावर अतिप्रसंग करत घातपात होऊ शकला असता. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


