मुंबई : वृत्तसंस्था
ठाकरे बंधूनी एकत्र मेळावा घेतल्यावर सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांनी आरोप प्रत्यारोप सुरु केले असतांना आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले कि, आम्ही (ठाकरे बंधू) एकत्र आल्यामुळे भाजप नेत्यांच्या बुडाला आग लागली आहे. ही आग सर्वांपुढे दाखवताही येत नाही आणि शमवताही येत नाही, मराठी माणसांचे आनंदी क्षण ज्यांना रुदाली वाटत असतील, ते अत्यंत विकृत व हिणकस व्यक्तीची माणसे आहेत, असेही ते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले.
उद्धव ठाकरे आज विधिमंडळात आले होते. यावेळी त्यांनी मराठीच्या मुद्यावरून राज व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यासह राज्यातील सर्वच भाजप नेत्यांचा येथेच्छ समाचार घेला. ते विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, आम्ही एकत्र आल्यामुळे या लोकांच्या बुडाला आग लागणे स्वाभाविकच आहे. कारण, भाजपचे राजकारणच तोडा, फोडा व राज्य करा यावर अवलंबून आहे. लोकांच्या घरांच्या होळ्या पेटवायच्या व त्यावर आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजायच्या हाच भाजपचा धंदा आहे. हा धंदा आता संपला आहे. त्यामुळे त्यांच्या बुडाला आग लागल्याचे मी समजू शकतो.
ते पुढे म्हणाले, काही लकडबग्घे (तरस) आहेत. हे लोक इथे गुण्यागोविंदाने राहणाऱ्यांमध्ये आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी काहीही बोलावे. त्यांना इथे कुणीही ओळखत नाही. मी त्यांना तरस या प्राण्याची उपमा दिली. पण हे लोक त्या ही लायकीचे नाहीत. काड्या करणे हाच त्यांचा उद्योग आहे. त्यांनी इकडे येऊन पाहावे. आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही. भाषेच्या सक्तीला विरोध आहे. त्यामुळे तुम्ही उगीच भाषिक वाद इकडे करू नका. आमच्याकडे सगळे आनंदाने राहतात. शिवसेना व शिवसैनिक रक्तदान, रुग्णवाहिका आदी सर्वच सेवा कोणतीही जात-पात धर्म न पाहता पुरवतात. त्यामुळे या बाहेरच्या लोकांनी स्वतःचे घर पाहावे. स्वतःचा पक्ष जो मेलेला आहे, तो जिवंत होतो का हे पहावे.
भाजप आमदार आशिष शेलार यांनी मराठीसाठी लढणाऱ्यांची तुलना पहलगाम हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांशी करत आहेत. पत्रकारांनी हा प्रश्न उद्धव ठाकरे यांना केला. त्यावर ते म्हणाले, मराठी माणसांची तुलना अतिरेक्यांशी करणारे लोक मराठी व महाराष्ट्राचे मारेकरी आहेत. या मारेकऱ्यांना मराठी लोकांनी आता ओळखले पाहिजे. हे मराठी भाषेचे मारेकरी आहेत. त्यांनी हा विषय काढलाच असेल तर पहलगामचे अतिरेकी भाजपमध्ये गेले का? हे त्यांनी सांगावे. ते सापडत का नाहीत? जे लोक आमच्यावर आरोप करत आहेत, त्यांच्या घरात हे अतिरेकी राहत आहेत का? गेले कुठे? त्यांना लाज वाटली पाहिजे. एकतर ती हिंदूंना वाचवू शकत नाही आणि मराठी माणसांवर अन्याय करणाऱ्यांची बाजू घेता. हे कर्मदरिद्री लोक आपल्या महाराष्ट्रात दुर्दैवाने राज्यकर्ते आहेत. याची लाज वाटते.