मुंबई : वृत्तसंस्था
मराठी व हिंदी भाषेचा वाद सुरु असून या मराठीच्या मुद्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २० वर्षानंतर एकत्र आले. यातच आता भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. एएनआय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये निशिकांत दुबे यांनी हिंदी भाषिकांना होत असलेल्या मारहाणीवर भाष्य केले. तसेच ठाकरे बंधुंना उर्दु भाषिकांना मारुन दाखवावं, असे थेट आव्हान दिले आहे.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घाणेरडं राजकारण सुरु आहे. तुम्ही खरंच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार असाल, तर तुमच्या जवळील माहीम दर्गावर जावं आणि तेथील उर्दु भाषिकांना मारुन दाखवावं. आपल्या घरात कोणीही वाघ असतो. तुमच्यात हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेशात या, तुम्हाला दाखवून देऊ. महाराष्ट्राबाहेर या, तुम्हाला आपटून आपटून मारु, असं आव्हान निशिकांत दुबेंनी दिलं आहे.
एवढ्यावरच दुबे थांबले नाही, पुढे ते म्हणाले, “मराठी लोक कुणाची भाकर खातायत?, आमच्या पैशांवर तुम्ही मराठी लोक जगताय. तसेच मराठी लोकांकडे कोणते उद्योग आहेत?, मराठी लोक किती टॅक्स देतात सांगा. खाणी आमच्याकडे आहेत, तुमच्याकडे आहेत का? सगळे उद्योग गुजरातकडे येतात. मी मराठीचा सन्मान करतो, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा सन्मान करतो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महाराष्ट्राचा खूप मोठा सहभाग आहे. परंतु आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, म्हणून घाणेरडं राजकारण सुरु आहे,” असा निशाणा निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधुंवर साधला.
“तुम्ही हुकुमशाही करत आहात, वर आमचे शोषण करून कर भरता. जर तुमच्यात हिंमत आहे, तुम्ही हिंदी भाषिकांना मारत आहात, तर उर्दू भाषिकांनाही मारा. तुम्ही जी ही नीच कृत्य करत आहात. जर त्यांच्या हिंमत असेल, तर त्यांनी बाजूलाच असलेल्या माहीम भागात जावे, माहीम दर्ग्याबाहेर कोणत्याही हिंदी भाषिक, उर्दू भाषिकाला मारून दाखवावं. मग मी म्हणेल की, ते खरंच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहेत आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालत आहेत”, अशा शब्दात निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंवर हल्ला चढवला.