लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जिल्हा रुग्णालयातील कैदी वार्डात कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. यात बाहेरुन एक टोळक्याने दुसर्या कैद्यावर हल्ला चढविल्याने रुग्णालयात तणावाचे वातवरण निर्माण झाले होते. याप्रकरणी सोमवारी ९ मे रोजी जिल्हापेठ पोलीसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील वार्ड क्रमांक ९ मध्ये कैदी वार्डात दशरथ बुधा महाजन रा. एरंडोल व सतीष मिलिंद गायकवाड रा. आंबेडकरनगर यांच्यासह आणखी तीन संशयीत उपचारासाठी दाखल झाले होते. रविवार असल्याने या संशयीतांचे कुटुंबिय त्यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी सतिश गायकवाड या कैद्याने दशरथ महाजन यांच्या कुटुंबियातील महिलेची छेड काढली. यातून त्या दोघांमध्ये वाद झाला असल्याचे कळते. या वादाचे रुपांतरण हाणामारीत झाल्याने गायकवाड गटाकडील सुमारे ३० ते ४० जणांचे टोळका रुग्णालयात दाखल झाला. या टोळक्याने कैदी वार्डातील दशरथ महाजन यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे रुग्णालयात रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांनी रात्रीच एका कैद्याला जिल्हा कारागृहात हलविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कैद्यावर झालेल्या हल्ल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली असून याप्रकरणी दशरथ बुधा महाजन (वय-४८, रा. एरंडोल) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दुसरा कैदी सतीष मिलिंद गायकवाड रा. आंबेडकरनगर यांच्याविरुद्ध अदखपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.