एरंडोल : प्रतिनिधी
पुरे भागातील जय हिंद चौक परिसरात उषाबाई भिका बडगुजर (५२) या महिलेचे तोंड कपड्याने बांधून व हातपाय दोरीने बांधून तीन तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी ३८ हजार रुपयाचे सोने-चांदीचे दागिने व १ हजार ५५० रुपये रोकड असा एकूण ३९ हजार ५५० रुपयाचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी भल्या पहाटे येथील जय हिंद चौक परिसरात घडली. याबाबत उषाबाई बडगुजर यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, उषाबाई भिका बडगुजर या एकट्याच राहतात. त्यांचे पती भिका बडगुजर हे रेल्वे खात्यात भुसावळ डिव्हिजनमध्ये केबिन मॅन या पदावरून निवृत्त झाले होते. मात्र त्यांचा २००३मध्ये मृत्यू झाला. त्यांना दोन अपत्य असून ते जळगाव येथे राहतात. सध्या त्यांचा पेन्शनवर उदरनिर्वाह सुरू आहे. दरम्यान, उषाबाई यांच्या पतीचे दुसरे लग्न सुमनबाई भिका बडगुजर यांच्याशी झाले होते. अरुण भिका बडगुजर हा अधूनमधून एरंडोल येथे उषाबाई बडगुजर यांच्या घरी येत होता. तो उषाबाईला ठार मारण्याचे धमकावत होता. ६ जुलै रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास जेवण झाल्यावर त्यांच्या घराच्या पुढच्या खोलीमध्ये लोखंडी गेटला कुलूप लावून त्या झोपल्या. कुलपाची एक चावी त्यांचा सावत्र मुलगा अरुण बडगुजर याच्याकडे होती. उषाबाई रात्री गाढ झोपत असताना रात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास अचानक तीन-चार जण घरात शिरले व त्यांनी उषाबाईचे तोंड कपड्याने बांधले. नंतर हात पाय दोरीने बांधले. त्यांनी उषाबाईच्या अंगावर असलेले दागिने व तिच्याकडे असलेली रोकड काढून नेली. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे.