जळगाव : प्रतिनिधी
मला न्यायालयाच्या तारखेवर हजर करा, असे म्हणत हर्षद रब्बी पटेल याने जिल्हा कारागृहात गोंधळ घालत व बॅरेकमध्ये जाण्यास नकार देत अंबादास जुलाल देवरे या कर्मचाऱ्यास शनिवारी मारहाण केली. पटेल याच्यासह अन्य बंद्यांना बॅरेकच्या बाहेर काढलेले होते. बॅरेकमध्ये परत जाण्याची वेळ झाल्याने देवरे यांनी त्यास बॅरेकमध्ये जाण्यास सांगितले.
मात्र, त्याने नकार देत माझी न्यायालयाची तारीख आहे, मला तारखेवर पाठवा असे सांगितले. त्यावेळी सुभेदार सुभाष खांडरे यांनी पोलिस पथक उपलब्ध नसल्याने तारखेवर नेता येणार नसल्याचे त्याला सांगितले. त्यामुळे तो देवरे यांच्या अंगावर धावून आला. मारहाणही केली. या प्रकरणी अंबादास देवरे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.