धरणगाव : प्रतिनिधी
रेल्वे रुळावर एक मृतदेह आढळला आणि नातेवाइकांनी ओळख पटवत त्याचे शवविच्छेदनही करून घेतले. अंत्यसंस्कारासाठी घरी सर्व नातेवाईक आले आणि रडारड सुरू झाली. मात्र, ज्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी झाली, ते रघुनाथ वामन खैरनार (६५, रा. पाळधी, ता. धरणगाव) हे साक्षात घरी परतले. यामुळे कुटुंबीय, नातेवाईक थक्क झाले आणि हा नेमका काय चमत्कार आहे, या विचारात पडले. प्रत्यक्षात ज्या मृतदेहाची ओळख पटविली, तो दुसऱ्याचाच असल्याचे स्पष्ट झाले आणि तो पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात परत नेण्यात आला.
सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील रहिवासी रघुनाथ खैरनार हे घरी कोणाला काहीही न सांगता गेल्या तीन ते चार दिवसांपासून घरून निघून गेले होते. बेपत्ता असल्याने कुटुंबीय त्यांचा शोध घेत असताना शनिवारी (दि. ५) सकाळी पाळधी गावाजवळच रेल्वे रुळावर एक मृतदेह आढळला. ही माहिती गावात पसरताच गावकऱ्यांसह बेपत्ता वृद्धाचे नातेवाईकही घटनास्थळी पोहोचले. रघुनाथ खैरनार यांच्या मृत्यूविषयी नातेवाइकांना कळविण्यात आल्याने त्यांचे सर्व नातेवाईक घरी पोहोचले. त्यामुळे घरात सर्वांना अश्रू अनावर असताना संध्याकाळी सात वाजता सदर वृद्ध गावातील साईबाबा मंदिराकडून येताना दिसले. त्यावेळी घरीही बाबा परत आले, असा निरोप मिळाला. यामुळे नातेवाईक, कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला व दुसरीकडे बाबांना जिवंत पाहून आनंदही गगनात मावेनासा झाला. रेल्वे रुळावर आढळलेल्या मृतदेहाचा चेहरा छिन्नविछिन्न झाल्याने तो स्पष्ट ओळखता येत नव्हता. गावकरी, नातेवाईक
घटनास्थळी पोहोचले व चेहऱ्याचा खालचा भाग रघुनाथ खैरनार यांच्याशी मिळताजुळता असल्याने नातेवाइकांनी हा मृतदेह खैरनार यांचाच असल्याची ओळख पटविली. त्यानंतर पोलिसांसह नातेवाईक हा मृतदेह शवविच्छेदनासाठी जीएमसीत घेऊन आले आणि संध्याकाळी शवविच्छेदनही झाले. संध्याकाळी सहा वाजता रुग्णालयातून मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. तो घरी घेऊन जात असतानाच बाबा घरी परतल्याचे रुग्णवाहिकेतील नातेवाइकांना कळविण्यात आले. सर्व हकीकत समजल्यानंतर पाळधी पोलिसांना कळवून मृतदेह रुग्णालयात परत नेण्यात आला