यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील आमोदा येथील मोर नदी पुलाजवळील अपघातांच्या मालिकेने आता वाहनधारक त्रस्त झाले आहेत. शुक्रवारी पुन्हा दोन अपघात झाले. त्यात दोन वाहने समोरासमोर धडकली तर एक ट्रक सरळ शेतात जाऊन फसला. दुपारी ३ वाजता झालेल्या पावसानंतर हे अपघात घडले. गेल्या तीन दिवसांतील हा पाचवा अपघात आहेत. दोन महिन्यातील जवळपास ३० वा अपघात आहे.
पहिल्या अपघातात, यूपी. ८३ सीटी. ८३१२ क्रमांकाचे मालवाहू वाहन भुसावळहून फैजपूरकडे जात होते. त्याचवेळीलहान मालवाहू वाहन फैजपूरहून भुसावळकडे निघाले होते. ही मोर नदी पुलाजवळ समोरासमोर येऊन धडकले. या धडकेत चालक किरकोळ जखमी झाले. या अपघातानंतर मोठे वाहन रस्त्यावर आडवे झाले. त्यामुळे जवळपास अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी फैजपूरकडून येणारी वाहतूक विरोदा-अमोदा मार्गे वळवण्यात आली. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. दुसऱ्या अपघातात, फैजपूरहून भुसावळकडे निघालेली जेके ०२ डीडी ०२९७क्रमांकाची ट्रक ब्रेक न लागल्याने थेट डाव्या बाजूला जाऊन मातीत फसली. सुदैवाने यात कोणीही जखमी किंवा हानी झाली नाही. मोठ्या मालवाहू वाहन चालकाच्या माहितीनुसार त्याने गाडीचे ब्रेक १५-२० फूट आधीपासून लावत होतो, पण ब्रेक व हँडल फसल्याने टेम्पोला धडक दिली. अन्यथा गाडी थेट नदीत गेली असती. टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.