पाचोरा : प्रतिनिधी
बसस्थानकावर शुक्रवारी खून झालेल्या आकाश मोरे याने दोन दिवसांपूर्वीच दोन्ही संशयितांवर पिस्तूल रोखले होते. त्याचा बदला म्हणून या दोघांनी गोळी झाडून त्याचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे दोन्ही संशयितांना पिस्तूल पुरविणाऱ्याही अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या घटनेत अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता तीन झाली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा येथील बसस्थानक परिसरात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गावठी कट्ट्यातून गोळीबार करीत आकाश कैलास मोरे (२६) याचा खून करण्यात आला होता. या घटनेनंतर मारेकरी नीलेश अनिल सोनवणे (२७) आणि एक अल्पवयीन असे दोनजण जामनेर पोलिसांना शरण आले होते. त्यांना पिस्तूल पुरविणारा शरद युवराज पाटील (३१, रा. बाहेरपूरा, पाचोरा) यालाही अटक करण्यात आली आहे. अल्पवयीनाची जळगावच्या बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
दरम्यान, दोघा संशयितांकडून दोन पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहेत. मृत आकाश मोरे याचे जळगाव जिल्हा रुग्णालयात शनिवारी शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर दुपारी ४ वाजेच्या सुमारास पाचोरा येथे पोलिस बंदोबस्तात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वाळू माफियांमधील आपापसातील भांडणावरून आकाश मोरे याच्यावर बेधुंद गोळीबार करीत त्याचा खून करण्यात आला. यातील संशयित नीलेश सोनवणे व शरद पाटील यांना पाचोरा न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
आकाश याने चार दिवसांपूर्वी रिल बनवून सोशल मीडियावर टाकले होते. यातील आशय बघता ही घटना म्हणजे पलटवार होता, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. आकाश याने दोन दिवसांपूर्वी संबंधित दोन्ही संशयितांवर पिस्तूल रोखले होते. त्यातून त्याचाच खून झाल्याची माहिती मिळाली. पाचोरा शहरात वाळू टोळ्या असून, संघटित गुन्हेगारी फोफावली आहे. यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची चर्चा शहरात सुरू होती.