मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या विजयी मेळाव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच्यावर सडकून टीका केली. आमच्यात (राज व उद्धव) असणारा आंतरपाट आज अनाजीपंतांनी दूर केला. आम्ही एकत्र आलोत. एकत्र राहण्यासाठी. हे पाहून अनेक बुवा- महाराज आज बिझी आहेत. कुणी लिंबू कापतंय, कुणी टाचण्या मारतंय, तर कुणी गावी जाऊन अंगारे-धुपारे करत आहेत. कदाचित रेडेही कापत असतील, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी हिंदीची सक्ती तुमच्या 7 पिढ्या आल्या तरी आम्ही होऊ देणार नाही, असा इशाराही सत्ताधारी भाजपला दिला.
उद्धव ठाकरे म्हणाले, आज बऱ्याच वर्षांनंतर राज व माझी भेट व्यासपीठावर झाली. आता पंचाईत अशी आहे की, ते मला सन्माननीय उद्धव ठाकरे असे म्हणाले… आणि साहजिकच आहे की, त्यांचेही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिले आहे. म्हणून मी माझ्या भाषणाची सुरूवात करताना सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी, हिंदू बांधवांनो, भगिनीनो व मातांनो. राज यांनी अप्रतिम मांडणी केली आहे. त्यामुळे माझ्या भाषणाची गरज आहे असे मला वाटत नाही. आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर, सर्वांचे लक्ष या भाषणाकडे आहे. पण आज आमच्या भाषणापेक्षा आमचे एकत्र दिसणे महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आज सर्वांनी मराठी भाषेसाठी वज्रमुठ दाखवली. महादेवराव जानकर यांनाही मी बऱ्याच वर्षांनी पाहिले.
पण एक गोष्ट नक्की, की आमच्या दोघांमध्ये जो अंतरपाट होता तो अनाजीपंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काही तुमच्याकडून अपेक्षा नाही. एकत्र आलोत. एकत्र राहण्यासाठी… मला कल्पना आहे की, अनेक बुवा, महाराज हे बिझी आहेत. कुणी लिंबू कापतंय, कुणी टाचण्या मारतंय, कुणी गावी जाऊन अंगारे धुपारे करत असेल, रेडे कापत असतील. त्या सर्वांना सांगतो की, या भोंदूपणाविरोधात आमच्या आजोबांनी लढा दिला होता. त्यांचे वारसदार म्हणून आम्ही तुमच्यापुढे उभे टाकलो आहोत.
ते पुढे म्हणाले, भाषेवरून एखादा विषय निघतो, तेव्हा तो केवळ वरवरचा धरून चालणार नाही. मधल्या काळात अगदी दोघांनी म्हणजे मी व राज काय आपण सर्वांनी या नतदृष्टांचा अनुभव घेतला आहे. वापराये आणि फेकून द्यायचे. आता आम्ही दोघे मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत. आजपर्यंत वापर करून घेतलात, अरे डोक्यावर शिवसेनाप्रमुख नसते तर तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत होते. कोणत्या भाषेत बोलत होतात. राज यांनी सर्वांच्या शाळा काढल्या, पण मोदींची शाळा कोणती? सर्वात उच्चशिक्षित आहेत….
पण हे जे काही मध्यंतरी बोललो तसे भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे. मधल्या काळात त्यांनी सुरू केले होते की, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले. हिंदुत्व ही काही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्याहून जास्त कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवता? 1992-93 साली जे काही घडले, तेव्हा आमच्या शिवसैनिकांनी अमराठी माणसांना वाचवले.
उद्धव म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी भाषेच्या आधारावर गुंडगिरी सहन करणार नाही असा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला तु्म्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंडच आहोत. आहोत आम्ही गुंड. न्याय मागणे म्हणजे गुंडगिरी नाही. तुमच्या दरबारात गुंडगिरी केल्याशिवाय न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करू. पण हे सगळे राजकीय बाटगे. देवेंद्र फडणवीस यांचे आजचे हे विधान संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवेळी स. का. पाटील यांनी केलेले एक विधान मला आठवते.


