मुंबई : वृत्तसंस्था
संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणारा ठाकरे बंधुंचा विजयी मेळावा आज होणार आहे. त्या मेळाव्याच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अनेक वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र येतील. ती घडामोड ठाकरेबंधूंचे बहुचर्चित मनोमिलन घडवणारी ठरणार का, याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
आज मोर्चा निघायालाच पाहिजे होता. मोर्चामध्ये मराठीच्या एकतेचं चित्र दिसले असते. कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं मी मुलाखतीत म्हटलं होतं. आज २० वर्षानंतर आम्ही एका व्यासपीठावर येत आहे. बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे
विजयी मेळाव्यात व्यासपीठावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दाखल झाले आहेत.
उद्धव ठाकरेंपाठोपाठ राज ठाकरे देखील मराठी विजय मेळाव्यासाठी वरळी डोम येथे दाखल झाले आहेत.
मराठी भाषेवरून वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी सुशील केडियाच्या ऑफिसवर मनसैनिकांनी हल्ला केला आहे. मेळावा सुरू होण्यापूर्वी मनसे स्टाइल दणका देण्यात आला आहे. केडियाने राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना डिवचलं होतं. सुशील केडिया मुंबईतला एक व्यावसायिक आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात ते वरळी डोम येथे पोहचतील. तर शर्मिला ठाकरे या वरळी डोममध्ये दाखल झाल्या आहेत.
ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासाठी वरळी डोमच्या गेटवर तुफान गर्दी झाली आहे. बऱ्याच मनसे, शिवसेनेच्या नेत्यांना आतमध्ये प्रवेश करणं कठिण झाले आहे. मोठ्या संख्येने महिला देखील यावेळी उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठी कलाकारांनीही या मेळाव्याला हजेरी लावली आहे. यात तेजस्विनी पंडित, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा समावेश आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित सहभागी झाली आहे. जे कलाकार या मेळाव्यासाठी येणार नाहीत, त्यांच्याविषयी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने नाराजी व्यक्त केली आहे.