मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबई येथे आज ५ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या ‘ठाकरे बंधू’चा विजयी मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याचे आयोजन वरळीतील डोम सभागृहात करण्यात आले आहे. या ऐतिहासिक मेळाव्याला अवघा काही वेळ शिल्लक राहिलेला आहे. अनेक मराठी कलाकार देखील या मेळाव्याला हजेरी लावण्यासाठी आले आहेत.
मराठीच्या मुद्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून हे दोन्ही भाऊ काय राजकीय भूमिका घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तत्पूर्वी या मेळाव्यात अभिनेत्री तेजस्विनी पंडित सहभागी झाली आहे. जे कलाकार या मेळाव्यासाठी येणार नाहीत, त्यांच्याविषयी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने नाराजी व्यक्त केली आहे.
संकटाच्या काळात त्या लोकांना राज ठाकरे आठवतात, परंतु जेव्हा मराठीसाठी एकत्र येण्याची वेळ येते तेव्हा मात्र हे लोक येत नाही. मी इतर कलाकारांबद्दल फारकाही बोलू शकणार नाही, मी मात्र कायम मराठी भाषेच्या लढ्यासोबत आहे. इतरवेळी शिवतीर्थाचा दरवाजा ठोठावणारे कलाकार ऐनवेळी गप्प असतात, ही चिंतेची बाब आहे, असे तिने कलाकारांविषयी बोलताना सांगितले.
या मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर लोकं येणार असल्याने डोम सभागृहात मोठा पोलीस बंदोबस्त सुरक्षेच्या कारणास्ताव तैनात करण्यात आला आहे. या मेळाव्यातून तब्बल १९ वर्षांनंतर मराठीच्या मुद्यावर ठाकरे बंधू अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे हे सर्वांत शेवटी भाषण करणार आहेत. त्या आधी राज ठाकरे यांचे भाषण होणार आहे. तसेच मंचावर उपस्थित असणाऱ्या काही नेत्यांना बोलण्याची संधी दिली जाणार आहे.