जळगाव : प्रतिनिधी
अॅप्लिकेशनच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवित निखिल कैलास गौड (२९, रा. राजमालती नगर) यांची १६ लाख ९८ हजार सहा रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. सुरुवातीला केलेल्या गुंतवणुकीवर १८ लाख ६० हजार रुपये नफा व्हर्चुअल पद्धतीने दाखवून तब्बल ६१ वेळा रक्कम स्वीकारण्यात आली. हा प्रकार १२ नोव्हेंबर २०२४ ते ३ जुलै २०२५ या दरम्यान सुरू होता. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजमालती नगरातील निखिल गौड यांचा ट्रॅव्हलचा व्यवसाय आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये त्यांच्याशी चार जणांनी संपर्क साधून त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीतून मोठ्या नफ्याचे आमिष दाखविले. यासाठी त्यांना ‘ट्रेण्ड नाऊ’ हे अॅप्लिकेशन इन्स्टॉल करण्यास व त्याद्वारे गुंतवणूक करण्यास सांगितले. व्यावसायिकाला नफा झाल्याचे भासवून अधिकची गुंतवणूक करण्यास सांगितले
गुंतविलेल्या रकमेवर नफा दिसत होता, मात्र तो व्हर्चुअल होता व ती रक्कम हातीही पडत नव्हती. असे असले तरी गौड यांनी तब्बल ६१ वेळा रक्कम पाठविली. नंतर त्यांना १८ लाख ६० हजार रुपयांचा नफा दाखविण्यात आला. या मोठ्या रकमेमुळे व्यावसायिकाने एकूण १६ लाख ९८ हजार सहा रुपये गमावले. नफा तर दूरच मुद्दल रक्कमही गेली व ती मिळत नसल्याने व्यावसायिकाने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संपर्क साधून फसवणूक करणाऱ्या चार जणांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.