यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील चुंचाळे गावाजवळ निबादेवी धरणावरून परत येत असताना दुचाकी अपघातात अकलूद येथील विजय शिवा भिल या १७वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली.
सविस्तर वृत्त असे कि, अकलूद येथील विजय भिल हा त्याचे मित्र मयूर सुधाकर सोनवणे (वय २१, रा. वाघळूद) आणि कृष्णा गजानन पवार (वय १८, रा. अकलूद) यांच्यासोबत निंबादेवी धरणावर गेला होता. परत येत असताना सावखेडासीम गावाजवळ अचानक एक म्हैस दुचाकीसमोर आली. दुचाकी चालक विजय भिल याने प्रसंगावधान राखत ब्रेक दाबला, मात्र वेगामुळे दुचाकी घसरली आणि हा अपघात घडला.
या अपघातात विजय भिल याचा जागीच मृत्यू झाला, तर मयूर सोनवणे आणि कृष्णा पवार हे दोघे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर तत्काळ स्थानिकांच्या मदतीने जखमींना सावखेडासीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे, डॉ. ऋषभ पाटील, अधिपरिचारिका प्रियतमा पाटील, बापू महाजन आदींनी जखमींवर तातडीने उपचार केले. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हलवण्यात आले आहे. रुग्णालयात मयत विजय भिल याचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. अपघाताची माहिती मिळताच मयताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.