एरंडोल : प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपळकोठा खुर्द येथे विद्यार्थ्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाचे चाक अंगावर गेल्याने शुभम योनाक्ष मासाळ हा चार वर्षीय बालक जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी दुपारी २ वाजता घडली.
सविस्तर वृत्त असे कि, पिंपळकोठा खुर्द येथील माजी सरपंच नारायण मासाळ यांचे नात आरुष वय ६ वर्षे) व शुभम हे दोघे पाळधी येथील जीपीएस शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यांना शाळेत जाण्यासाठी (क्र. एम.एच. १९ इ.ए. ६८५६) हे वाहन लावले होते. शुक्रवारी सकाळी आरुष व शुभम हे या वाहनातून शाळेत गेले. शाळा सुटल्यानंतर ते दोन्ही वाहनातून खाली उतरल्यानंतर गाडी वेगाने पुढे निघाली. शुभम यास वाहनाचा धक्का लागला आणि तो खाली पडला. त्याचवेळी त्याच्या अंगावरून गाडीचे चाक गेले.
रात्री उशिरा शुभमचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर रात्री १० वाजेच्या सुमारास शुभमवर पिंपळकोठा खुर्द येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान शुभमचा मृतदेह घेऊन वाहन गावात पोहचले असता शुभमचे आईवडील व कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. कुटुंबीयांचा विशेषतः शुभमच्या मातेचा आक्रोश पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले. या प्रकरणी वाहनचालक मनोज मुक्तारसिंग पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.