पाचोरा : प्रतिनिधी
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, असा रील टाकणाऱ्या आकाश कैलास मोरे (२६) या तरुणाची पाचोरा बसस्थानक परिसरात दोन संशयितांनी गोळ्या घालून हत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. दरम्यान, गोळीबारानंतर नीलेश अनिल सोनवणे (२७) आणि प्रथमेश सनील लांडगे (१९) हे दोन्ही संशयित स्वतःहून जामनेर पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजनगरातील रहिवासी आकाश मोरे हा तरुण शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास बसस्थानकात आला होता. याचवेळी तिथे आलेल्या नीलेश व प्रथमेश यांनी गावठी कट्ट्यातून आकाशवर आठ ते दहा राउंड फायर केले. यात, आकाश जागीच ठार झाला. त्याचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ बसस्थानक गाठले आणि बंदोबस्त तैनात केला. घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबच्या टीमने उत्तरीय तपासणी केली. आकाश मोरे हा अविवाहित असून, त्याच्या आईचे गेल्या महिन्यात निधन झाले होते. तो सेंटिंग काम करीत होता.
नीलेश व प्रथमेश यांच्याकडून दुचाकी, दोन पिस्तूल आणि दोन मोबाइल जप्त केले आहेत. दुचाकीच्या वादातून आम्ही गोळीबार केल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. दरम्यान, संशयितांच्या आई- वडिलांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली. दोन दिवसांपूर्वीच आकाश याने रील तयार करून समाजमाध्यमावर टाकली होती. ‘दोन दिवसांत ३०२ चा गुन्हा घडणार’ असल्याचे या रीलच्या माध्यमातून सांगितले होते. यानंतर दोन दिवसांनी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला.