छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोतील काळा गणपती मंदिरासमोर भीषण अपघात झाला आहे. एका चारचाकी कारने 6 जणांना उडवले आहे. आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला आहे. अपघातात मंदिराचे सुरक्षा रक्षक शेवाळे यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत एकनाथ मगर (वय 30, रा. सिडको, छत्रपती संभाजीनगर) हा क्रीडा संकुल, गारखेडा येथून टेनिस खेळून परतत होता. यावेळी काळा गणपती मंदिरासमोर कारवरील ( स्विफ्ट डिझायर, MH-20-HH-0746) ताबा सुटल्याने मोठा अपघात घडला. मंदिरासमोर टर्न घेताना त्याने निष्काळजीपणे, भरधाव वेगाने वाहन चालवत रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना धडक दिली. या अपघातात काळा गणपती मंदिराचे सुरक्षारक्षक गुणाजी लक्ष्मणराव शेवाळे (वय 70) गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले. तर चौघे जखमी झाले.
जखमीमधील मनीषा विकास समधाने (वय 40), विकास समधाने (वय 50) दोघांनाही खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर रवींद्र भगवंतराव चौबे (वय 65) आणि श्रीकांत प्रभाकर राडेकर (वय 60) यांना मिनी घाटी रुग्णालयात प्राथमिक उपचारांसाठी नेण्यात आले असून, नातेवाईक त्यांना पुढील उपचारासाठी इतर रुग्णालयात हलवत आहेत.
ज्येष्ठ लोक नेहमीप्रमाणे सकाळी मंदिरात येत होते. अचानक त्यांच्यादिशेने एक भरधाव कार आली. रस्तावरील चौघांसह मंदिराच्या पायऱ्यावर असलेल्या एकासह चप्पल काढणाऱ्या महिलेलाही कारने चिरडले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेनंतर कारचालक प्रशांत मगर याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या दुर्घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे