मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यात हिंदी भाषेवरून ठाकरे बंधूनी अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात रान उठवलं होतं. त्यांचा कडाडून विरोध पाहता तसेच राज्यभरातूनही वाढता विरोध लक्षात घेतला सरकारने एक पाऊल मागे घेत हा निर्णय रद्द केला आहे.
त्यामुळे आता ५ जुलै रोजी ठाकरे बंधू विजयी मेळाव्याच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. वरळीतील डोम सभागृहात या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेचे नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे, तर राज ठाकरेंना सल्ला दिला आहे.
जेव्हा मुंबईतील सोसायट्यांमध्ये मराठी माणसांना मांस खाण्यास मनाई केली जाते तेव्हा तुम्ही कुठे गेले होते? मुंबई महापालिकेत 25 वर्ष यांची सत्ता होती, काय केलं मराठी माणसांसाठी? असा खडा सवाल रामदास कदमांनी केला आहे. तसेच मराठी माणूस आता मुंबईमध्ये फक्त 17 टक्के उरला असल्याचे ते म्हणाले. हिंदी सक्तीच्या विरोधात विजयी जल्लोष कसला साजरा करताय, असा सवालही त्यांनी केला आहे.
५ जुलै रोजी ठाकरे बंधू हिंदी सक्तीच्या मुद्यावर एकत्रित एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या विजयी मेळाव्याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यावर सत्ताधारी विशेष करून शिंदे सेनेतील नेत्यांकडून टीका केली जात आहे. याच अनुषंगाने माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत उद्धव ठाकरे हा आतल्या गाठीचा माणूस दाखवायचा चेहरा वेगळा आहे, अशी घणाघाती टीका केली आहे.
राज साहेबांना विनंती आहे, जरा समजून जपून पुढचा विचार करा, असा सल्ला रामदास कदमांना राज ठाकरेंना दिला आहे. ते काँग्रेससोबत गेले. उद्धव ठाकरे फक्त तुम्हाला वापरून घेतील. उद्धव ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे होऊ शकले नाहीत, मग ते तुमचे कसे होणार, असे देखील कदम म्हणाले आहेत. शिवसेना संपवण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं. उद्धव ठाकरे कोणाच भाऊ होऊ शकत नाही, अशी बोचरी टीकाही रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.