पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील जमदाडे नाल्याजवळ गुरुवारी दुपारी भरधाव स्कूल बसने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करुन ही नोंद पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील किशोर रघुनाथ पवार (वय ४६) असे अपघातात मयत झालेल्या शेतमजूराचे नाव आहे. दरम्यान, ३ जुलैला दुपारी ४ वाजेच्या सुमारास किशोर पवार हे दुचाकीने घरी जात होते. याच वेळी जमदाडे पुलावर समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या स्कूल बसने किशोर पवार यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात किशोर पवार यांच्या डोक्यास गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, किशोर पवार यांना तत्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तर ही नोंद शून्य क्रमांकाने पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहे.
मयत किशोर पवार यांच्या पश्चात्य पत्नी, ३ मुले, मुलगी, भाऊ, ३ बहिणी असा परिवार आहे. किशोर पवार हे शेतमजुरी करुन आपल्यासह आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे