जळगाव : प्रतिनिधी
शहरातील महात्मा गांधी मार्केटमध्ये आपल्या दुकानावर कामासाठी दुचाकीवर येत असलेल्या भादली येथील तरुणाला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिल्याने, तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता आसोदा रस्त्यावर घडली. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
दरम्यान, कार चालकाने मयत मोहम्मद इब्राहीम खाटीक (वय ३८, रा.भादली, ता.जळगाव) यांचा जीव घेण्याच्या उद्देशाने धडक दिल्याचा आरोप करत, हा घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. हा अपघात नसून, घातपात असल्याचा आरोप मोहम्मद खाटीकच्या नातेवाईकांनी केला. मोहम्मदला जीवे मारण्यासाठीच हा अपघात केला असल्याचाही आरोप नातेवाईकांनी केला, जोपर्यंत आरोपीला अटक होणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. त्यासाठी रुग्णालयाच्या आवारातच ठिय्या आंदोलन करण्यात आले.
मयत मोहम्मद इब्राहीम खाटीक या तरुणाचा शहरातील महात्मा गांधी मार्केटमध्ये कापडाचा व्यवसाय होता. सकाळी नियमिपणे तो आपल्या दुचाकीने जळगावकडे जाण्यासाठी निघाला, त्याचवेळी त्याच्या दुकानात काम करणारे गावातील दोन युवकही दुसऱ्या दुचाकीने मोहम्मद खाटीकच्या मागेच निघाले, सकाळी ११ वाजता आसोदा रस्त्यालगत असलेल्या एका पेट्रोलपंपासमोरच भादली येथील दीपक धनगर हा आपल्या चारचाकी कारने, मागून आला. त्याच्या पुढे असलेल्या मोहम्मद खाटीकच्या दुचाकीला जोरदार धडक दिली, त्यात मोहम्मद खाटीकच्या छातीवरुन कार गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. मागून येत असलेल्या मोहम्मदच्या मित्रांनी लगेच, त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर खासगी रुग्णालयात त्याला हलविले. दुपारी ३ वाजता त्याचा मृत्यू झाला.
मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईकांसह भादली येथील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. मोहम्मद लहान असतानाच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.