जळगाव : प्रतिनिधी
सायबर गुन्हेगारांनी एका व्यक्तीला तब्बल १२ लाख रुपयांहून अधिक रकमेचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना २ जुलै रोजी समोर आली आहे. टेलिग्रामवर सोप्या टास्कच्या नावाखाली सुरुवातीला नफा दाखवून नंतर चुकीच्या टास्कचे कारण देत वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास भाग पाडून ही फसवणूक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पारोळा तालुक्यातील एका तरूणाने फिर्याद दिली आहे. १६ ते २२ जून या कालावधीत ही घटना घडली. त्याच्या टेलीग्राम आयडीवर एका व्हॉट्सअॅप क्रमांकाच्या धारकाने संपर्क साधला. या सायबर गुन्हेगारांनी त्याला ‘गुगल कॉईन्स ग्रुप’ आणि त्यानंतर ‘गुगल व्हिआयपी ग्रुप’ या टेलीग्राम ग्रुपमध्ये अॅड केले. या ग्रुपमध्ये त्याला ऑनलाइन टास्क पूर्ण करून पैसे कमावण्याचे आमिष दाखवण्यात आले.
सुरुवातीला काही टास्क पूर्ण केल्यावर युवकाला थोडा नफाही मिळाला, ज्यामुळे त्याचा विश्वास वाढला. विश्वास संपादन झाल्यानंतर, सायबर गुन्हेगारांनी युवकाला टास्क चुकीच्या पद्धतीने केल्याचे सांगून ‘रिकव्हरी’च्या नावाखाली वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे मागण्यास सुरुवात केली. कोणताही परतावा न देता, तरुणाकडून वेगवेगळ्या युपीआय आयडी, बँक खात्याद्वारे तब्बल १२ लाख १९ हजार १८३ रुपये स्वीकारले. मात्र, परतावा मिळत नसल्याने, आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्याने तात्काळ जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करत आहेत.