यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील आमोदा येथील मोर नदीच्या पुलाजवळ अपघातांची मालिका सुरूच आहे. गुरुवारी दुपारी मालवाहू ट्रक घसरून सरळ छोट्या पुलाजवळील नाल्यात जाऊन अडकली. या अपघातात ट्रकचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या पुलाजवळ अथवा पिंपरूळ रोड ते आमोदादरम्यानच्या रस्त्यावर सुरू असलेली अपघातांची मालिका केव्हा खंडित होईल, याबाबत आता वाहनधारकही चिंतेत पडले आहेत.
गुरुवारी दुपारी मालवाहू ट्रक (आर. जे. ११/ जी. सी. ८२३३) भुसावळकडून फैजपूर कडे जात होती. अपघातांचे क्षेत्र असणाऱ्या या वळणावर गाडी घसरत छोट्या पुलाजवळील नाल्यात गेली. यामध्ये ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला. कालच या रस्त्यावरील गतिरोधक काढून टाकले. काही नागरिकांचे म्हणणे होते की, काही दिवसांपूर्वी बस अपघात गतिरोधकाजवळ ब्रेक लावल्याने झाला होता. येथे वारंवार अपघात कशामुळे होत आहे, याचे कारण शोधून उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.