श्रीनगर: वृत्तसंस्था
हर हर महादेव, बम बम भोलेचा जयघोष करत बुधवारी पहाटे साडेचार वाजता अमरनाथ यात्रेसाठी पहिला समूह रवाना झाला. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी शिवभक्तांच्या पहिल्या समूहाला झेंडा दाखवून रवाना केले. अमरनाथ यात्रा अधिकृतरीत्या गुरुवारपासून सुरू होत आहे.
काश्मीरच्या हिमशिखरात ३८८० मीटर उंचीवरील गुहेत बर्फापासून तयार होणाऱ्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविक खडतर मार्गावरून प्रवास करतात. अमरनाथ यात्रेसाठी दोन मार्ग आहेत. अनंतनाग जिल्ह्यातून जाणारा ४८ किमीचा नुनवान-पहलगाम हा पारंपरिक मार्ग आहे. तर गांदरबल जिल्ह्यातून बालटाल मार्ग १४ किमीचा आहे. बालटाल मार्गाचे अंतर कमी असले तरी तो सरळ चढण असल्यामुळे अधिक खडतर आहे. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी भगवतीनगर आधार शिबिरात पूजा-अर्चा करून यात्रेसाठी निघालेल्या भाविकांना हिरवा झेंडा दाखवला आणि सर्व शिवभक्तांना यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. दहशतवाद्यांच्या धमक्यांना झुगारून हजारो भाविक अमरनाथ यात्रेसाठी आले असून यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे सिन्हा म्हणाले. भाविकांच्या पहिल्या तुकडीत १,११५ महिला, ३१ बालके आणि १६ तृतीयपंथीयांसह ५,९८२ भाविकांचा समावेश आहे. या भाविकांवर कुलगाम, अनंतनाग, श्रीनगरमध्ये जिल्हा प्रशासन आणि स्थानिकांनी पुष्पवृष्टी करत स्वागत केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अमरनाथ यात्रेसाठी आतापर्यंत ३ लाख ३१ हजारांहून अधिक भाविकांनी नोंदणी केली आहे.
यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची जागेवरच नोंदणी करून त्यांना टोकन देण्यात येत आहे. टोकनवरील क्रमांकानुसार भाविकांना समूहाने सोडण्यात येत आहे. ३८ दिवस चालणाऱ्या यात्रेची औपचारिक सुरुवात गुरुवारी ३ जुलैला होणार असून ९ ऑगस्टला यात्रेचा समारोप होईल.