चाळीसगाव :प्रतिनिधी
काम करून चाळीसगाव येथे घराकडे परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला कारने जोरदार धड़क दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तरुण जागीच ठार झाल्याची घटना येथील गिरणा पुलावर बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. कार चालकाविरोधात मेहुणबारे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उजेर अब्दुल रशीद शेख (२७, अनिलनगर, चाळीसगाव) हा तरुण त्याच्या दुचाकीवरून (एमएच-२०/एफडब्ल्यू-६३६८) वरून मेहुणबारे येथून एम. आर.चे काम आटोपून चाळीसगावकडे येत होता. त्याचवेळी धुळ्याहून चाळीसगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने (यूपी १९/व्ही ७९२२) उजेर शेख याच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. हुजेर हा रस्त्यावर असलेल्या लोखंडी कठड्यावर पडून गंभीर जखमी झाला. त्याच्या कपाळास व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा अपघातस्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच मेहुणबारे येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणास चाळीसगाव येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी जहांगीर नजीर सय्यद (अनिलनगर, चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक मोहमद उसामा रियाज अहमद (जगाधरी, हरियाणा) याच्याविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.