जळगाव : प्रतिनिधी
मद्य वितरक परवाना देण्याचे आमिष दाखवून शिवाजी सीताराम पाटील (वय ६३, रा. दादावाडी मागे) यांची दोन जणांनी नऊ लाख रुपयांमध्ये फसवणूक केली. हा प्रकार नोव्हेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान घडला. या प्रकरणी दीपक लोटन खैरनार (६०, रा. महावीर नगर), नितीन गुणवंतराव सोनवणे (६४, रा. गणेशवाडी) या दोघांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, दीपक खैरनार व नितीन सोनवणे या दोघांनी कट रचून आपण बॅरल अँड कास्क कंपनीचे स्टेट पार्टनर व मार्केट हेड असल्याचे शिवाजी पाटील यांना सांगितले. तसेच कंपनीमधून उत्पादित होणारा मद्यमाल जळगाव जिल्ह्यात विक्री करण्यासाठी परवाना काढून देण्याचे आमिष दाखविले. यासाठी त्यांनी पाटील यांच्याकडून नोव्हेंबर २०२२पासून फेब्रुवारी २०२५ पर्यंत वेळोवेळी एकूण नऊ लाख रुपये घेतले.
दीपक खैरनार व नितीन सोनवणे यांनी वितरक नेमण्याविषयी सांगितले असता शिवाजी पाटील यांनी आपल्याकडे मद्य विक्रीचा परवाना नसल्याचे सांगितले. त्यावर दोघांनी महा विक्री परवान्याची गरज नसून ‘परवानाधारक विदेशी मद्य घाऊक विक्रेते’ नेमण्याची जबाबदारी कंपनीची असल्याचे दोघांनी सांगितले होते. परवान्यासाठी दीपक खैरनार याच्या खात्यावर ६ फेब्रुवारी २०२३ रोजी एनईएफटीद्वारे दोन लाख रुपये जमा केले. त्यानंतर करारनामा केला. त्यानंतर खैरनार याला सात लाख रुपयांचा धनादेश दिला. तो त्याने १३ फेब्रुवारी रोजी वटविला. मात्र, नंतर परवाना मिळत नसल्याने पाटील यांनी पाठपुरावा केला असता खैरनार याने तीन धनादेश दिले. मात्र, ते वटले नाही
वेळोवेळी पैसे देऊन अनेक दिवस झाले तरी परवाना मिळत नसल्याने पाटील यांनी पाठपुरावा केला. मात्र, दोघांनी परवाना तर दिलाच नाही व रक्कमही परत केली नाही. त्यामुळे शिवाजी पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दीपक खैरनार, नितीन सोनवणे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.