मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात केलेली मागणी चर्चेत आली आहे. राज्यात वीज कोसळल्याने शेतकरी आणि शेतमजुरांचे मृत्यू झाल्यास त्यांच्य कुटुंबांना फक्त चार लाख मदत दिली जातात, मात्र ही मदत वाढवून द्यावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
राज्यात वीज कोसळल्याने शेतकरी आणि शेतमजुरांचे मृत्यू होतात. जेव्हा शेतकरी किंवा शेतमजुरांचा मृत्यू होतो, तेव्हा त्यांचे कुटुंब उघड्यावर पडते. अशा कुटुंबांना फक्त चार लाख मदत दिली जाते आहे. पण ही मदत वाढवून १० लाखांची करावी. वाघाने हल्ला केल्यावर २५ लाख रुपयांची मदत केली जाते. वीज कोसळून मृत्यू झाल्यामुळे मात्र चार लाख मदत केली जाते. ही मदत पुरेशी नसल्याने या मदतीची रक्कम वाढवावी, असे वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे.
यावर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी, राज्य आपत्ती व्यवस्थापन मध्ये आधी वीज कोसळून मृत्यू याचा समावेश नव्हता पण आता त्याचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणी मदत निधी वाढवून देण्याबाबतच्या सूचनांचा विचार करू, असे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले. दरम्यान, महाराष्ट्रात वीज पडून वर्ष 2022 मध्ये 236 मृत्यू झाले आहेत तर वर्ष 2023 मध्ये 181 इतकी मनुष्यहानी झाल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.