नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार अनेक योजना सुरु करीत असतांना आता देशातील पहिल्यांदाच नोकरीच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवणाऱ्या लाखो तरुणांसाठी केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘रोजगार संलग्न प्रोत्साहन’ (Employment Linked Incentive – ELI) योजनेला मंजुरी दिली आहे.
या योजनेअंतर्गत, पहिली नोकरी मिळवणाऱ्या पात्र तरुणांना सरकारकडून 15 हजार रुपयांची प्रोत्साहन रक्कम दिली जाईल. या योजनेचा उद्देश केवळ तरुणांना रोजगारासाठी प्रोत्साहित करणे नाही, तर संघटित क्षेत्रात नोकऱ्यांची संख्या वाढवणे हा देखील आहे. रोजगार संलग्न प्रोत्साहन योजना (ELI – Employment Linked Incentive Scheme) ही केंद्र सरकारच्या त्या महत्त्वाकांक्षी योजनेचा एक भाग आहे, ज्याअंतर्गत तरुणांना रोजगार आणि कौशल्य विकासासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या योजनेची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत:
कर्मचारी आणि कंपनी दोघांनाही लाभ : ही योजना केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नाही, तर नवीन रोजगार देणाऱ्या कंपन्यांनाही प्रोत्साहन देते.
दोन टप्प्यांत रक्कम : कर्मचाऱ्याला मिळणारी 15 हजार रुपयांची रक्कम दोन हप्त्यांमध्ये दिली जाईल.
स्वयंचलित प्रक्रिया : या योजनेसाठी कोणताही वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित असेल.
योजनेचा लाभ कोणाला मिळणार? (पात्रता निकष)
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचारी आणि कंपनी दोघांसाठीही काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत.
कर्मचाऱ्यांसाठी पात्रता:
अर्जदार भारताचा नागरिक असावा आणि त्याची ही पहिलीच नोकरी असावी.
कर्मचाऱ्याचे मासिक वेतन १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) त्याची ही पहिलीच नोंदणी असणे अनिवार्य आहे.
लाभ मिळवण्यासाठी किमान ६ महिने नोकरी करणे आवश्यक आहे.
कंपनीसाठी पात्रता:
कंपनी EPFO अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
ज्या कंपन्यांमध्ये 50 पेक्षा कमी कर्मचारी आहेत, त्यांना किमान २ नवीन कर्मचारी नियुक्त करावे लागतील.
50 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपन्यांना किमान 5 नवीन कर्मचारी नियुक्त करणे बंधनकारक आहे.
पैसे खात्यात कसे आणि केव्हा येणार?
‘या’ योजनेची जमेची बाजू म्हणजे यासाठी कोणतीही अर्ज प्रक्रिया नाही.
स्वयंचलित नोंदणी : जेव्हा कंपनी तुमच्या नावाने EPFO खाते उघडेल, तेव्हा तुम्ही आपोआप या योजनेसाठी पात्र व्हाल.
पहिला हप्ता : नोकरीचे 6 महिने पूर्ण झाल्यानंतर पहिला हप्ता थेट तुमच्या आधार-लिंक्ड बँक खात्यात (DBT द्वारे) जमा होईल.
दुसरा हप्ता : नोकरीला 12 महिने पूर्ण झाल्यावर आणि वित्तीय साक्षरता कार्यक्रम (Financial Literacy Program) पूर्ण केल्यावर दुसरा हप्ता जमा होईल.
या रकमेतील काही भाग तुमच्या भविष्य निर्वाह निधी (PF) खात्यात जमा केला जाईल, जो तुम्ही नंतर काढू शकाल.
कंपन्यांना काय फायदा?
या योजनेअंतर्गत, नवीन रोजगार देणाऱ्या कंपन्यांनाही सरकारकडून आर्थिक प्रोत्साहन दिले जाईल. 1 लाख रुपयांपर्यंत पगार असलेल्या प्रत्येक नवीन कर्मचाऱ्यामागे कंपनीला ३,००० रुपयांपर्यंत प्रोत्साहन रक्कम मिळू शकते.
केवळ तरुणांना आर्थिक स्थैर्य नाही, तर कंपन्यांनाही प्रोत्साहित देण्याचे सरकारकडून प्रयत्न
रोजगार संलग्न प्रोत्साहन योजना (ELI – Employment Linked Incentive Scheme) योजना ही एक दुहेरी रणनीती आहे. ही योजना केवळ तरुणांना नोकरीच्या सुरुवातीच्या काळात आर्थिक स्थैर्य देणार नाही, तर कंपन्यांना नवीन भरतीसाठी प्रोत्साहित देखील करेल. यामुळे देशातील संघटित क्षेत्रातील रोजगाराला चालना मिळून एक कुशल मनुष्यबळ तयार होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.