मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्र सरकारचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राज्यातील विविध प्रश्नांमुळे गाजत आहे. बीडमध्ये अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. या धक्कादायक प्रकरणामुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर धनंजय मुंडे यांनी गंभीर आरोप केला होता. तर मुंडे यांचे आरोपीसोबत फोटो समोर आले होते.
यानंतर काल धनंजय मुंडे यांनी विधिमंडळाच्या बाहेर या प्रकरणावर आपली प्रतक्रिया दिली होती. आता या प्रकरणी अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील प्रश्न विचारले आहे. धनंजय मुंडेंनी याप्रकरणाची चौकशी विशेष चौकशी समितीतर्फे केली जावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवला होता. याप्रकरणावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्वीट करत टीका केली आहे.
जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो, ज्याच्यावर महिला अत्याचाराच्या केसेस आहेत, त्याचे म्हणणे मुख्यमंत्री एका दिवसात ऐकून एका महिला आयपीएस ची SIT लावतात, असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला आहे. बीडच्या त्या अल्पवयीन मुलीला तातडीने न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तसेच विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अंजली दमानिया यांचे ट्वीट
इतकी मित्रता? मुंडेंनी मागितली आणि एका दिवसात मुख्यमंत्र्यांनी SIT जाहीर केली? आज दुपारी २ वाजता मी विधानपरिषदे च्या उपसभापती निलम गोऱ्हे यांची भेट, विधान भवनात येऊन घेणार आहे. काल धनंजय मुंडेंना बीड च्या अल्पवयीन मुलीवर भाश्य करताना बघून खूप राग आला.
जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो, ज्याच्यावर महिला अत्याचाराच्या केसेस आहेत, त्याचे म्हणणे मुख्यमंत्री एका दिवसात ऐकून एका महिला आयपीएस ची SIT लावतात? बीडच्या त्या अल्पवयीन मुलीला तातडीने न्याय मिळालाच पाहिजे, पण त्यासाठी लढायला चांगली सुसंस्कृत माणस आहेत. आम्ही नेहमी प्रमाणे लढूच.
ह्यावर बोलण्याचा हक्क धनंजय मुंडेंना नक्कीच नाही. वैष्णवीच्या केस मधे मी तिच्या आईवडिलांना घेऊन वर्षा बंगल्यावर गेले तेव्हा एक महिन्याने फ़ास्ट ट्रैक वर केस केली. ही केस मुख्यमंत्र्यांनी का तत्काळ फ़ास्ट ट्रैक वर केली नाही? सगळ्या महिला आमदारांनी ह्याचा विरोध करायला हवा. महिलांच्या सगळ्या प्रश्नांची दाखल ही तत्काळ घेतली गेली पाहिजे, पण ती मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून घ्यावी.