मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात तृतीय भाषा म्हणून पहिलीपासून हिंदी शिकवण्यावर सुरू असलेला वाद अद्याप शमलेला नाही. यातच 5 जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वतीने विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या बॉम्बे स्कॉटिश शाळेचा संदर्भ देतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
स्वतःच्या मुलांना बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे आणि भारतीय भाषांना विरोध करायचा? अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा समाचार घेतला आहे. ठाकरे बंधूंनी भारतीय असलेल्या हिंदी भाषेला विरोध केला आहे. मात्र, इंग्रजीला पायघड्या टाकल्या असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. राज्य सरकार कोणाच्याही दबावापुढे झुकणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा जीआर आता राज्य सरकारच्या वतीने मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंनी पाच जुलै रोजी काढण्यात येणारा मोर्चा रद्द केला असला तरी त्याच दिवशी विजयी मेळावा घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे आता या मेळाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्ला चढवला. स्वतःच्या मुलांना इंग्रजी शाळेमध्ये शिकवायचे आणि दुसऱ्यांच्या मुलांसाठी भारतीय भाषेला देखील विरोध करायचा? असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंचा चांगला समाचार घेतला आहे.
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर विरोधकांनी महायुती सरकारची चौफेर कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सरकार कुणाच्याही दबावापुढे झुकणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. सरकारने हिंदीच्या मुद्यावर एक समिती स्थापन केली आहे. ही समितीच आता योग्य तो निर्णय घेईल. सरकार केवळ कोणत्याही पक्षाचे हित पाहणार नाही, केवळ महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे लक्ष पाहील. आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही, असे ते म्हणालेत. ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन क्रिकेट खेळावे, स्वीमिंग करावी आम्हाला काही अडचण नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी ठाकरे बंधूंना हाणला.
फडणवीस म्हणाले की, मी काय दोन भावांनी एकत्रित न येण्याचा जीआर काढला आहे काय? मी असा कोणताही जीआर काढला नाही. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात जो अहवाल आला होता, त्या अहवालात त्यांचा उजवा हात मानला जाणाऱ्या उपनेत्याने पहिली ते बारावी हिंदी सक्तीची करा असे लिहिले होते. हा अहवाल उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारला. त्यानंतर नेहमीच्या सवयीप्रमाणे घुमजाव केले. त्यानंतरही आम्ही कोणताही इगो न मानता त्यासंदर्भातील निर्णय केला आहे. मी पुन्हा एकदा सांगतो. आम्ही निर्णय केला, आता समिती स्थापन केली आहे. ही समितीच आता योग्य ते ठरवेल. आम्ही कोणत्याही पक्षाचे हित पाहणार नाही. आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे पाहू. महाराष्ट्राचे सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय घेईल. आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही.


