मुंबई : वृत्तसंस्था
बीड येथील कोचिंग क्लासेसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण झाल्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांनी या प्रकरणातील एक आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या जवळचा असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता संदीप क्षीरसागर यांनी स्वतः पुढे येत स्पष्टीकरण दिले आहे. प्रस्तुत प्रकरणात आरोपी माझ्या जवळचे असले तरी पीडितेने तक्रार दाखल करतात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मी त्यांच्यासारखा 150 दिवस पळून गेलो नाही, असे ते म्हणालेत.
बीड येथील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण झाले होते. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीनुसार 2 शिक्षकांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यापैकी विजय पवार हा आरोपी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या जवळचा असल्याचा आरोप आहे. त्यांनीच त्याला बीडच्या शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष केले होते. गंभीर म्हणजे ज्या दिवशी या प्रकरणात गुन्हा दाखल झाला, त्याच दिवशी आरोपी आमदार क्षीरसागर यांच्यासोबत असल्याचेही समोर आले होते. यामुळे बीडच्या राजकारणात एकच खळबळ माजली होती.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोपींना अभय दिल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर संदीप क्षीरसागर यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. ते मंगळवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी एसआयटीची मागणी केली आहे. त्याला माझी सहमती आहे. घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा आहे. गुन्हा दाखल झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या शिक्षकांना अटक झाली. आमची प्रशासनासोबत चर्चा सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहे.
मी त्यांना आरोपी माझ्या जवळचे असले तरी कारवाई करण्यास मागेपुढे पाहू नका असे सांगितले आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यास 10 दिवस लागले नाही. पीडितेने तक्रार दाखल करताच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. मी त्यांच्यासारखे काही 150 दिवस पळून गेलो नाही. त्यांना त्यांचे मंत्रिपद गेल्याचे दुःख झाले आहे. त्यांनी या प्रकरणात जशी आक्रमक भूमिका घेतली, तशीच आक्रमक भूमिका त्यांनी मस्साजोग प्रकरणात घेण्याची गरज होती. उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः बीडचे पालकमंत्री आहेत. त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा होता, असे क्षीरसागर म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, प्रस्तुत प्रकरणात पोलिस प्रशासन तत्परतेने कारवाई करत आहे. मी त्यावर फार काही बोलण्याची गरज नाही. पण मुंडे साहेब स्वतः सत्तेत आहेत. त्यांनी जोर लावला पाहिजे. मस्साजोग प्रकरणात मुंडे म्हणाले होते की, त्यांना 150 दिवस बाहेर रहावे लागले. त्यांचे मंत्रिपद गेले. त्याचे त्यांना दुःख आहे. पण लोकप्रतिनिधी रोज रस्त्यावर काम करतो. मी रोज चहाच्या टपरीवर जातो. तिथे लोक येतात. भेटतात. संबंधित लोक माझ्या ओळखीचे आहेत. मी पीडितेकडे जाणार होतो. पण आत्ताच त्यांच्याकडे जाणे योग्य नाही. त्यामुळे मी तिकडे गेलो नाही, असेही संदीप क्षीरसागर यावेळी बोलताना म्हणाले.