नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आजपासून जुलै महिन्याला सुरुवात झाली असून तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांची कपात केली आहे. हे नवीन दर मंगळवार (१ जुलै) पासून लागू झाले आहेत. त्याचवेळी, घरगुती गॅस सिलिंडरच्या म्हणजेच १४ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत कपात केल्याने व्यावसायिक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत झालेली कपात ही दैनंदिन कामकाजासाठी गॅसवर अवलंबून असलेल्या सर्व व्यावसायिकांसाठी आनंदाची बातमी आहे. या सिलिंडरच्या दरात कपात केल्याने हॉटेल, रेस्टॉरंट्स, ढाबे इत्यादी व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळेल कारण, ते मोठ्या प्रमाणात व्यावसायिक गॅस सिलिंडर वापरतात. कमी किमतींमुळे, या व्यवसायांचा खर्च कमी होईल आणि ते त्यांच्या ग्राहकांना चांगल्या सेवा देऊ शकतील.
सिलिंडर कोणत्या शहरात किती स्वस्त झाला ?
देशातील प्रमुख शहरांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ही कपात वेगळी आहे. तुमच्या शहरात आता नवीन दर काय आहे ते जाणून घ्या.
- दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये १९ किलोचा एलपीजी सिलिंडर आता १७२३.५० ऐवजी १६६५ रुपयांना उपलब्ध होईल. येथे ५८.५० रुपयांची कपात करण्यात आली आहे.
- कोलकाता : कोलकातामध्ये हा सिलिंडर ५७ रुपयांनी स्वस्त झाला आहे आणि आता १७६९ रुपयांना उपलब्ध होईल.
- मुंबई : मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत ५८.५० रुपयांनी कमी झाली आहे. आता त्याचा दर १६१६ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या महिन्यात, म्हणजे जूनमध्ये तो १६७४.५० रुपये होता.
- चेन्नई : चेन्नईमध्ये तुम्हाला आता व्यावसायिक सिलिंडरसाठी १८२३.५० रुपये द्यावे लागतील.
- पटना : पाटण्यात त्याची किंमत १९२९.५० रूपये आणि भोपाळमध्ये १७८७.५० रूपये असेल.
- या कपातीमुळे व्यापाऱ्यांची बचत होईल, ज्यामुळे त्यांचा नफा वाढू शकेल.
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत सलग चौथ्या महिन्यातही कपात झाली आहे. जूनमध्ये, तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती २४ रुपयांनी कमी केल्या होत्या. मेमध्ये १४.५० रुपयांनी कमी केली होती. तर, १ एप्रिलला व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीही ४१ रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या. या सततच्या कपातीवरून असे दिसून येते की आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती स्थिर होत आहेत किंवा कमी होत आहेत, ज्याचा थेट फायदा ग्राहकांना होत आहे.


