पारोळा : प्रतिनिधी
तालुक्यातील सुमठाणे येथील वनक्षेत्राच्या कुरण जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत सापडलेल्या शोभाबाई रघुनाथ कोळी (वय ४८, रा. उंदिरखेडे, ता. पारोळा) यांच्या मृतदेहाची पोलिसांनी ओळख पटवली. त्यानंतर तपासचक्रे फिरवित महिलेचा खून करुन पसार होत असलेल्या अनिल गोविंदा संदांशिव (वय ४५, रा. उंदीरखेडे, ता. पारोळा) याच्या मुसक्या आवळल्या. त्याला खाक्या दाखविताच महिलेकडे असलेल्या सोन्यांच्या दागिन्यांसाठी आणि महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून त्याने खून केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सविस्तर वृत्त असे कि, वनक्षेत्राच्या राखीव कुरण जंगलाच्या मध्यभागी एका महिलेला छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजून गेली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तात्काळ महिलेची ओळख पटवून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांकडून महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरु होते. त्याकरीता धुळे, नंदूरबार, नाशिक या जिल्ह्यातून वयस्कर महिला हरविली आहे का याची देखील तपासणी केली जात होती. याचवेळी पारोळा तालुक्यातील उंदीरखेडे येथील शोभाबाई कोळी या हरविल्याची माहिती पारोळा पोलिसांना मिळाली.
छिन्नविछिन्न अवस्थेत आढळलेल्या महिलेचे फोटो पोलिसांकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. दरम्यान, हरविलेल्या शोभाबाई कोळी यांचा फोटो आणि जंगलात आढळून आलेल्या मृतदेहामध्ये साम्य आढळल्याने त्या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करुन त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयत शोभाबाई कोळी या धूणीभांडी करुन सोन्याचे दागिने परिधान करीत होत्या. त्यामुळे गावातील अनिल संदांशिव याने महिलेसोबत ओळख निर्माण केली. त्यानंतर तिचा विश्वास संपादन करुन तीला सुमठाणे गावाजवळ असलेल्या वनक्षेत्राच्या जंगलात नेले. याठिकाणी महिलेचे हातपाय बांधून तिच्या चेहऱ्यावर दगड टाकून खून केल्याची संशयिताने कबुली दिली. तसेच हा खूनाला अनैतिक संबंधाची देखील किनार असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.