चाळीसगाव : प्रतिनिधी
जळगाव- चांदवड महामार्गावरील चाळीसगाव शहराला लागून असलेल्या खडकी बु, या गावातून गेलेल्या महामार्गावर सोमवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अपघातात दुचाकीवर मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, गावातील आबा जानराव (धनगर) (३५) हे गावातील भगवान कोल्हे (२६) याला सोबत घेऊन दुचाकीवरून शेताकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव वाहनाने धडक दिली. या धडकेत आबा जानराव याचा मृत्यू झाला. भगवान कोल्हे हा गंभीर जखमी झाला. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर कोणीच दिसत नसल्याचा फायदा घेत वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. अपघात करणारे वाहन हे टेम्पो असल्याचे समजते. अपघातानंतर संतप्त झालेल्या खडकी ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून जळगाव-चांदवड रस्ता आंदोलन करीत रोखून ठेवला. यावेळी महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पोलिस घटनास्थळी पोहचले.
जळगाव-चांदवड हा महामार्ग असताना हा रस्ता म्हणजे दरदिवसाला लहान मोठ्या अपघातांना निमंत्रण देत आहे. एखाद्या वेळेस या रस्त्यावर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबधित प्रशासनाने या रस्त्याची नवनिर्मिती करणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या रस्त्यावर वेगमर्यादा, वाहतूक नियमन व सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. रस्त्यावर गतिरोधक बसवावे, अशी मागणी खडकी बुद्रुक परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.