रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील येथील दाम्पत्य गुजरात (बडोदा) येथे स्थायिक होते. तेथे पुलावर हे दाम्पत्य दुचाकीने जात असताना ट्रकने धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना नुकतीच घडली असून गावात शोककळा व्यक्त केली जात आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मृतांची नावे ललित मुरलीधर भंगाळे (३६) व रुजुदा ललित भंगाळे (३४) ह.मु. बडोदा (मूळ रा. खिर्डी, ता. रावेर) अशी आहेत. ललित भंगाळे एका खासगी कंपनीत तर रुजुदा भंगाळे या एस.एस.व्ही. शाळेत शिक्षिका होत्या. रुजुदा यांना सोडण्यासाठी दुचाकीने जात असताना बडोदा येथे वाघोदिया पुलावर ट्रकने जोरदार धडक दिली. यात या दाम्पत्याचा मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात दोन लहान मुले आहेत. दुर्वांक (७), विनय (९ महिने) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी पल्लवी नारखेडे यांनी तक्रार दिल्याने पोलिसात नोंद करण्यात आली आहे. ललित भंगाळे खिर्डी येथील मुरलीधर गिरधर भंगाळे यांचे पुत्र तर रुजुदा या फैजपूर ता. यावल येथील श्रीदत्त मेडिकलचे संचालक संजय महादेव झोपे यांच्या कन्या होत.