धरणगाव : प्रतिनिधी
शहरातील जवाहर रोडवरील श्रीराम मंदिरासमोर राहणाऱ्या वृद्ध महिलेवर भरदिवसा अज्ञात हल्लेखोराने घरात घुसून जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात लीलाबाई रघुनाथ विसपुते (७३) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या जळगावमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, लिलाबाई विसपुते आपल्या मुलीकडे काही दिवसांसाठी आल्या होत्या. दुपारी ३:१५ वाजेच्या सुमारास त्या खोलीत विश्रांती घेत असताना अज्ञात हल्लेखोराने मागच्या दरवाजातून घरात प्रवेश करून त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने आठ ते नऊ वार केले. यामध्ये त्यांचा डावा हातही गंभीर जखमी झाला असून एक बोट तुटले आहे. हल्ल्यावेळी कुटुंबातील सदस्य हॉलमध्ये होते. नातू तेजस पोतदारने घरात प्रवेश करताना मागच्या दरवाजातून एक व्यक्ती पळून जाताना पाहिला व त्याचा पाठलाग केला. मात्र तो हल्लेखोर फरार होण्यात यशस्वी झाला.
लिलाबाई विसपुते यांना तत्काळ धरणगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले. विशेष बाब म्हणजे, घरातून कोणतीही चोरी किंवा दागिने चोरीला गेलेले नाहीत, त्यामुळे या हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.