अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील प्र. डांगरी येथील ६७ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जबाजारी झाल्याच्या ताण तणावातून विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २२ रोजी रात्री घडली.
सविस्तर वृत्त असे कि, प्र. डांगरी येथील अल्पभूधारक शेतकरी विनोद रामराव शिसोदे (वय ६७) हे २२ रोजी दुपारी ३ वाजता कुणाला काहिही न सांगता घरातून निघून गेले होता. त्यांचा मुलगा राहुल व पुतण्या राकेश शिसोदे यांनी त्यांचा शोध घेतला असता ते मारवड रस्त्याकडे गेल्याची माहिती मिळाली.
मारवड रस्त्यालगत शेतांमध्ये शोध घेतला असता ते गावातील पुष्पाबाई शिसोदे यांच्या शेतात बेशुद्ध अवस्थेत मिळाले. तर त्यांच्याजवळ विषारी औषधाची बाटली ही पडली होती. यानंतर त्यांना तत्काळ खासगी वाहनाने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हे.कॉ. सुनील अगोने करत आहेत.
दरम्यान, मयत शेतकरी विनोद शिसोदे यांच्याकडे दीड बिघे शेती असून त्यांच्यावर ८ लाख हातउसनवारी व सोसायटीचे २५ हजार असे ८.२५ लाख रुपये कर्ज होते. हे कर्ज फेडावे या विवंचनेतूनच त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मयत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तत्काळ मदत मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मयत विनोद शिसोदे यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, २ भाऊ असा परिवार आहे.