जळगाव : प्रतिनिधी
शेतामधील खांबाजवळ शिडी लावून काम करीत असताना त्यावरून पडल्याने कैलास भिकाजी महाजन (५२, रा. गणेशवाडी) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (२२ जून) दुपारी दोन वाजेच्या सुमारास शिरसोली शिवारामधील शेतात घडली.
सविस्तर वृत्त असे कि, गणेशवाडी परिसरातील टेन्ट हाऊसचे मालक कैलास महाजन यांचे शिरसोली शिवारात शेत आहे. रविवारी ते शेतातील एका खांबाजवळ शिडी लावून काम करीत होते. त्यावेळी शिडीवरून ते खाली पडले व त्यांच्या बरगड्यांना मार लागला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. बराच वेळ ते व्यवस्थित बोलतही होते. मात्र, नंतर अचानक प्रकृती खालावली व त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. मयताच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, असा परिवार आहे.



