बीड : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडची बीड तुरुंगात प्रकृती बिघडली आहे. त्याची तुरुंगातच वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, कराडला शुगर आणि कमी रक्तदाबाचा त्रास जाणवत आहे. सध्या वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे आणि तब्येतीत अधिक बिघाड झाल्यास त्याला रुग्णालयात दाखल केले जाण्याची शक्यता आहे.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून वाल्मीक कराड ओळखले जातात. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्यावर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा दबाव निर्माण झाला होता. अखेरीस त्यांनी प्रकृती कारण पुढे करत मंत्रिपदाचा राजीनामा दिला. दरम्यान, वाल्मीक कराडला कठोर शिक्षा व्हावी यासाठी या प्रकरणाचे वकीलपत्र प्रसिद्ध सरकारी वकील उज्वल निकम यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
वाल्मीक कराडला बीडच्या तुरुंगात व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याचा आरोप निलंबित पीएसआय रणजित कासले यांनी केला आहे. कासले यांनी सांगितले की, कराडसाठी तुरुंगात विशेष सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याला झोपण्यासाठी अतिरिक्त पांघरूण दिले जाते, चहा पिण्यासाठी वेगळा कप वापरतो, तसेच इतर कैद्यांच्या नावावर तो रेशन घेतो. कराडवर खरोखर कारवाई करायची असेल, तर त्याची तात्काळ दुसऱ्या तुरुंगात रवानगी करावी, अशी मागणी कासले यांनी केली आहे.


