मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबईची लोकल अनेक कारणाने नेहमीच चर्चेत येत असतांना आता पुन्हा एकदा मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ही घटना केव्हा व कोणत्या लोकलमध्ये घडली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण रेल्वे पोलिसांनी त्याची चौकशी करण्यास सुरूवात केली आहे.
लोकल ट्रेनची गर्दी ही मुंबईच्या जीवनरक्ताचाच एक भाग आहे. सकाळी व संध्याकाळी, लाखो प्रवासी आपल्या कामाच्या ठिकाणी, शाळा-कॉलेज किंवा घरी पोहोचण्यासाठी या ट्रेनमधून प्रवास करतात. यामुळे लोकलचे डब्बे कायम तुडुंब भरलेले असतात. त्यात पाय ठेवायला जागा नसते. लोक एकमेकांना धक्के देत, हातात मोबाईल किंवा वर्तमानपत्र पकडून, कसेबसे प्रवास करतात. ही गर्दी केवळ प्रवास नाही, तर मुंबईकरांचा धैर्य, सहनशीलता आणि जिद्द यांचे प्रतीक मानली जाते. कधी हसत-खिदळत, तर कधी एकमेकांवर रागावत – भांडत ही गर्दी पुढे सरकते. ही गर्दी मुंबईच्या चैतन्याचा खरा चेहरा मानली जाते. पण त्यातून अनेकदा हाणामारीचे गंभीर प्रसंगही घडतात. अशाच एका गंभीर घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडिओत दिसून येत आहे की, काही महिलांमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाला. त्यानंतर त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. हाणामारी करणाऱ्या महिला एकमेकांची केस धरतात. शिवीगाळ करतात. नखांनी एकमेकींना ओरबाडतात. चापटा – बुक्क्यांचाही वर्षावर करतात. यामुळे एक-दोन महिलांच्या चेहऱ्यावरून रक्त ओघळताना दिसून येत आहे. काही महिला हा प्रकार थांबवण्याची विनंती करतानाही व्हिडिओत दिसत आहेत. पण भांडण करणाऱ्या महिला थांबताना दिसत नाहीत.
ही घटना मुंबईतच घडली आहे. पण ती पश्चिम, मध्य रेल्वे की हार्बर मार्ग यापैकी कोणत्या मार्गावरील लोकलमध्ये घडली हे स्पष्ट झाले नाही. रेल्वे पोलिस या घटनेची शहानिशा करत आहेत. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नेटकरी या महिलांमध्ये जागेच्या मुद्यावरून वाद झाला असण्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. तर काही जण हा प्रकार वैयक्तिक वादातून झाल्याचा संशय व्यक्त करत आहेत. पण सर्वांनी या महिलांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे गर्दीच्या वेळी मुंबई लोकलमध्ये असे प्रकार नेहमीच घडतात. यापूर्वीही लोकलमधील हाणामारी होण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. पण महिलांनी एकमेकींना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्याचा हा प्रकार पहिल्यांदाच घडल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांच्या डब्ब्यात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचीही मागणी केली जात आहे.