पुणे : वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु असतांना तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते मंत्री शंभूराज देसाई यांनी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आधीच चर्चा झाली असल्याची माहिती दिली आहे. राज ठाकरे यांच्या बोलवण्यावरून एकनाथ शिंदे हे त्यांच्या घरी जेवण्यासाठी गेले होते, अशी आठवण देखील त्यांनी करून दिली. यांच्या या वक्तव्यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युतीची चर्चा सुरू झाली आहे. यातच आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने दैनिक सामनाच्या अग्रलेखातून राज ठाकरे यांना एकत्र येण्यासाठी साद घालण्यात आली आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? याबाबत राज्यात तर्क-वितर्क लावले जात आहे. यातच मंत्री शंभूराज देसाई यांना प्रसारमाध्यमांनी युती बाबत प्रश्न विचारले होते. यावेळी देसाई यांनी हे उत्तर दिले आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय हा एकनाथ शिंदे घेणार असल्याने म्हटले आहे.
या संदर्भात शंभूराज देसाई म्हणाले की, एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या निमंत्रणावरून त्यांच्या घरी जेवायला गेले होते. त्या दोघांमध्ये चर्चा झाली आहे. त्यामुळे आता जो निर्णय घ्यायचा आहे. तो एकनाथ शिंदे यांनीच घ्यायचा आहे. आमचा पक्षाचा म्हणजेच शिवसेनेचा निर्णय आम्ही घेतला आहे. राजकीय निर्णय घेण्याचे सर्व अधिकार हे राज्य कार्यकारिणी असो किंवा राष्ट्रीय कार्यकारिणी असो, पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना दिलेले आहे. त्यामुळे यावर अंतिम निर्णय हा शिंदे साहेब घेणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.


