धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील नांदेड येथे सुमारे दोन महिन्यांपूर्वी ठिबक सिंचन पद्धतीने लावणी केलेल्या चक्री पिकाला योग्य भाव नसल्याने शेतकऱ्याने वैतागून उभ्या पिकावर रोटाव्हेटर फिरवला आहे. नांदेड, ता. धरणगाव परिसरात येथे बुधवारी दुपारी हा प्रकार घडला.
नांदेड येथील संजय बाबुराव पाटील यांची धावडे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून शेती आहे. यात पाच बिघे क्षेत्रात ठिबक सिंचनाद्वारे उन्हाळ्यात चक्री या पिकाची लागवड केली होती. सद्यस्थितीत पीक परिपक्व झालेले असताना या पिकाला योग्य भाव नसल्याने कुणीही व्यापारी माल घेण्यासाठी यायला तयार नव्हते. याला वैतागून चक्रीच्या उभ्या पिकावर रोटाव्हेटर फिरवला आहे.
पीक लावणीपासून ते परिपक्व झालेल्या पिकाच्या मशागतीवर आजपावेतो सुमारे पन्नास ते साठ हजाराच्या जवळपास खर्च आलेला असल्याचे शेतकरी संजय पाटील यांनी सांगितले. गेल्या वर्षी या परिसरात बहुसंख्य शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर चक्रीच्या पिकाची लागवड केली होती. त्यावेळी व्यापाऱ्यांकडून आठ ते दहा रुपये किलो प्रमाणे खरेदी केली गेली होती. गेल्या वर्षी मिळालेल्या चांगल्या भावामुळे यावर्षी देखील बहुसंख्य शेतकऱ्यांनी चक्रीच्या पिकाची लागवड केली आहे. परंतु या वर्षी योग्य भावच नसल्यामुळे कुणीही व्यापारी मालाची उचल करण्यासाठी येत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा हिरमोड झाला. उभ्या पिकावर रोटाव्हेटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे