एरंडोल : प्रतिनिधी
तालुक्यातील रिंगणगाव येथील तेजस गजानन महाजन (वय १३) याचा गळा चिरून खून केल्याप्रकरणी दोनजणांना बुधवारी अटक करण्यात आली. यातील तिसरा संशयित मात्र पसार झाला आहे. धक्का लागल्याच्या कारणावरून तीनही जणांनी तेजसला मारहाण केली नंतर एकाने चाकूने गळ्यावर वार करून खून केल्याची कबुली दिली आहे. हरदास डेमशा वास्कले (वय ३५, रा. नांदीया, ता. भगवानपुरा, जि. खरगोन) आणि सुरेश नकल्या खरते (वय ३४, रा. धोपा, ता. झिरण्या, ता. खरगोन) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील तिसरा आरोपी रिचडिया तुकाराम कटोले (२०, रा. रा. नांदीया, ता. भगवानपूरा) याच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, रिंगणगाव येथील आठवडे बाजारात सोमवारी सायंकाळी सुरेश खरते व रिचडीया कटोले हे फिरत असताना तेजस यास सुरेश वास्कूले याचा धक्का लागला. यावरुन वाद होऊन सुरेश वास्कूले याने तेजसला शिवीगाळ करून मारहाण केली. रिचडीया कटोले याने त्याच्याकडील चाकूने तेजसच्या गळ्यावर वार करून ठार केले. नंतर त्याला झाडाझुडपांत नेऊन टाकून दिले.
मुलाचा नरबळीच असून या प्रकरणाचा खोलवर तपास करून न्याय मिळावा, अशी मागणी मयत मुलाचे वडिल गजानन महाजन यांनी केली आहे. याविषयी त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘माझ्या शेतात काम करणारा एक मजूर घटना घडण्याच्या अगोदरपासून संशयितांसोबत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. या मजुरावर माझा संशय असून तो मोकाट असल्याचा दावाही त्यांनी निवेदनातून केला आहे.
घटना घडल्यानंतर मंगळवारी सकाळीच वास्कले हा पत्नी समिता व मुलांसोबत कामानिमित्त आणि त्याच्या शेजारी राहणारा सुरेश खरते हा नातेवाइकांच्या लग्नासाठी गावातून पसार झाले. गावात शेतीकामासाठी आले असताना ते काम अपूर्ण सोडून हे दोघे गायब झाल्याने संशय बळावला. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने वास्कले हा फैजपूर-रावेर मार्गावर लावण्यात आलेल्या नाकेबंदीत अलगद सापडला, तर दुसरा आरोपी सुरेश खरते याला थोपा घाटात जाऊन पोलिसांनी अटक केली. या दोघांनीही खुनाची कबुली दिली आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, एरंडोल पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड, पोउनि सोपान गोरे, शरद बागल, श्रीकृष्ण देशमुख, रवी नरवाडे, अक्रम शेख, हरिलाल पाटील आदी पोलिस पथकाने केली. दरम्यान, आरोपींना एरंडोल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे