मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शरद पवारांबाबत केलेल्या विधानाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. शरद पवार यांनी वेळोवेळी भाजपला मदत केली आहे, शिवाय राज्यात भाजपचं सरकार आणण्यात त्यांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा आहे, असा खळबळजनक दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला आहे.
“राज्यात 2014 साली भाजपचे सरकार आणण्यासाठी शरद पवार साहेबांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा आहे. वेळोवेळी त्यांनी भाजपला मदत केली आहे. मात्र आता त्यांना एवढा भाजपचा तिटकारा का? तर देशात सर्वात मोठा विरोधक मी व माझा पक्ष, हे दाखवण्यासाठी आणि आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात,” असा टोला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शरद पवारांना लगावला आहे.
यावेळी काँग्रेसवरही त्यांनी जोरदार टीका केली. ‘राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना जर दारूचे भाव कमी पाहिजे असतील तर मी सरकारला त्यांच निवेदन देईल. हिंदू धर्मात कोणी कुठे कशी पूजा करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे रायगडमध्ये काही पूजा झाली असेल तर त्यात गैर काय?’, असा सवालही प्रतापराव जाधव यांनी केला.


