यावल प्रतिनिधी । गिरडगावजवळील केळीच्या बागेला मंगळवारी १९ एप्रिल रोजी दुपारी आग लागून साडेपाच हजार केळी खोड जळाल्याने दोन शेतकर्यांचा सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले. चार तासानंतर यावल नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने आगीवर नियंत्रण मिळवले.
याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील गिरडगाव येथील आदीवासी पावरा वस्तीला लागून गोरख पाटील व बापू ठाकूर रा. किनगाव ता. यावल यांची शेती आहे. यंदा या दोघांनी शेतात केळीची लागवड केलेली आहे. मंगळवारी १९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शेतातील केळीच्या बागाला अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच पोलिस पाटील अशोक पाटील, एस.टी. चालक भैय्या पाटील, ज्ञानेश्वर पाटील, बापू पाटील, मधुकर पाटील यांनी तातडीने अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. अवघ्या काही मिनीटात अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल होवून चार तासानंतर ही आग आटोक्यात आणली. परंतू तोपर्यंत केळीची बाग जळाल्याने सुमारे पाच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. यावल पोलिस ठाण्याचे प्रभारी व प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस अधीक्षक आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जगन पाटील दाखल झाले. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.