जळगाव : प्रतिनिधी
कौटुंबिक वादाविषयी तडजोड झाल्यानंतर पत्नीला घेण्यासाठी गेलेले योगेश रामचंद्र सोनवणे (३२, रा. रिंगणगाव, ता. एरंडोल) यांना शालकाने जबर मारहाण केली. तसेच पत्नीसह शालकाच्या पत्नीनेही शिवीगाळ केली. ही घटना दि. १६ जून रोजी तालुक्यातील आसोदा येथे घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश सोनवणे व त्यांची पत्नी सपना सोनवणे यांच्यामध्ये कौटुंबिक वाद असल्याने त्याविषयी महिला दक्षता समितीमध्ये तक्रार करण्यात आली होती. त्यामध्ये तडजोड झाली व योगेश हे आसोदा येथे पत्नीला घेण्यासाठी गेले. त्यावेळी शालकाच्या पत्नीने ‘माझ्या नवऱ्याला उठविण्याच्या धमक्या देत असतात’, असे म्हणत वाद घातला व शिवीगाळ केली. त्यावेळी योगेशची पत्नी सपना हिनेही शिवीगाळ करीत मला नांदण्यासाठी यायचे नसून मुलीला देखील देणार नाही, असे सांगितले.
पत्नीने येण्यास नकार दिल्याने योगेश हे बसस्थानकाकडे जात असताना त्यांच्या पाठीमागे येत दोघींनी पुन्हा शिवीगाळ केली.तसेच शालक गोपाल सुधाकर बाविस्कर याने बसस्थानक परिसरात शिवीगाळ करीत कॉलर पकडून जमिनीवर पाडले व मारहाण केली. याप्रकरणी योगेश सोनवणे यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.


